बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामपंचायत माळविहीर येथील धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला असून बनावट कागदपत्रे तयार करून अपार्टमेंट बांधकामास परवानगी दिल्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे.या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक 230/2026 अन्वये भादंवि कलम 420, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात माजी सरपंच सौ. उषा सुनिल खैवान,तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माणिक प्रल्हाद शेळके आणि विद्यमान सरपंच सौ. अर्चना दिलीप आडवे यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. फिर्यादी मधुकर गवते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गट नं. 233 मधील प्लॉट नं. 20 ते 23 वर चिखली रोड स्थित ‘रॉयल अपार्टमेंट’ बांधकामासाठी नियमबाह्य पद्धतीने परवानगी देण्यात आली.
विशेष म्हणजे, एकाच बांधकामासाठी दोन वेगवेगळे प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसेच ग्रामसेवक माणिक शेळके यांनी कोणताही अधिकार नसताना बनावट पूर्णत्व प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असून चौकशी अहवालानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायत कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनात खळबळ उडाली आहे. तपास अधिकारी युवराज रबडे हे अधिक तपास करत आहेत.
येळगावचा मुद्दा ऐरणीवर!
दरम्यान, माळविहीरप्रमाणेच शेजारच्या येळगाव,सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीतही मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असल्याने अशाच प्रकारचा गैरप्रकार सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणावे,अशी जोरदार मागणी होत आहे.










