spot_img
spot_img

लेखणीत ग्रामीण वास्तव… कवितेत ‘पोशिंदा’; पुण्याच्या साहित्य मंचावर बुलढाण्याचा डंका! ज्योती सिनगारे यांना राज्यस्तरीय ‘वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव’ पुरस्कार; देऊळगाव महीच्या साहित्यिक कर्तृत्वाला मानाची मोहोर!

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) ग्रामीण जीवनातील वास्तवाला शब्द देणारी, स्त्रियांच्या व्यथा मांडणारी आणि सामाजिक जाणिवांना आपल्या लेखणीतून आवाज देणारी देऊळगाव महीची साहित्यप्रतिभा पुण्याच्या साहित्य मंचावर गौरविण्यात आली. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री व समाजसेविका सौ. ज्योती सिनगारे (वायाळ) यांना ‘वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘पोशिंदा’ कवितेने रसिकांची मने जिंकत या सोहळ्यात लक्ष वेधले.

रानकवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या १०० व्या मराठी काव्य संमेलनानिमित्त ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्याकडून हा सन्मान करण्यात आला. पुण्यात पार पडलेल्या भव्य साहित्य संमेलनात प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सिनगारे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उद्घाटक भाऊसाहेब भोईर यांच्यासह निवृत्ती अण्णा बादल, प्रा. डॉ. शैलेंद्र बनगे, प्रा. हनुमंत धालगडे, अभिनेत्री प्रीती पौळ, सिनेअभिनेते गुलाब राजा फुलमाळी आणि अभिनेत्री माया बोणे या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

सिनगारे यांच्या लेखनात ग्रामीण भागातील जगणे, महिलांच्या अडचणी आणि समाजातील प्रश्न यांना ठळक स्थान आहे. कविता, कथा आणि लेखांच्या माध्यमातून त्यांनी या विषयांना प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार देऊळगाव महीसह बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.

‘पोशिंदा’ कवितेला मिळालेली रसिकांची दाद आणि साहित्यिक योगदानासाठी मिळालेला राज्यस्तरीय सन्मान यामुळे सिनगारे यांच्या लेखणीचे वेगळेपण अधोरेखित झाले. ग्रामीण भागातील अनुभवांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या त्यांच्या कार्याला या पुरस्काराने मानाची पावती मिळाली आहे.

मुख्य आयोजक कवी सुभाष सोनवणे, दत्तू ठोकळे, जगदीप वनशिव, लोककवी सीताराम नरके आणि राहुल जाधव यांनी काव्य संमेलनाचे शिस्तबद्ध आयोजन केले. या सन्मानानंतर सिनगारे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देऊळगाव महीच्या साहित्यिक वाटचालीसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरला असून, स्थानिक प्रतिभेला राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळालेली दाद नवोदित लेखकांसाठीही उमेद वाढवणारी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!