शेगाव (हॅलो बुलढाणा) देशाच्या सीमेवर शत्रूच्या हालचाली टिपणारी नजर आता कॉलनीच्या रस्त्यांवरील संशयास्पद हालचालींवर खिळली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिक विष्णू शंकर सुर्वे यांनी सैनिक कॉलनीच्या सुरक्षेसाठी स्वतःहून रात्रगस्त सुरू केली आहे. देशासाठी २० वर्षे पहारा देणारा हा सैनिक निवृत्तीनंतरही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जागत आहे.
रात्री बाराचा ठोका पडतो, परिसर शांत होतो आणि सुर्वे यांची रात्रपाळी सुरू होते. हातात काठी, सोबत बॅटरी आणि सतर्कतेची शिट्टी घेऊन ते पहाटे पाच वाजेपर्यंत कॉलनीच्या रस्त्यांवर गस्त घालतात. बंद घरे, अनोळखी व्यक्ती आणि संशयास्पद हालचालींवर त्यांची बारीक नजर असते. नागरिक निर्धास्त झोपावेत, म्हणून हा माजी सैनिक स्वतःची झोप बाजूला ठेवतो
या उपक्रमात विनोद ओवे, धम्मपाल इंगळे, धनराज ससाणे, पृथ्वीराज वानखेडे आणि घाटे काकाही सहभागी होतात. काही काळ गस्त घालून साथीदार घरी परततात; मात्र सुर्वे यांचा पहारा पहाटेपर्यंत सुरूच राहतो. सैन्यातील शिस्त आणि जागरूकता त्यांच्या प्रत्येक फेरीत दिसते.
या सामूहिक प्रयत्नाला कॉलनीतील महिलांचीही आपुलकीची साथ आहे. कमलाबाई गायगोळ, सुमन वानखेडे, सावदेकर काकू आणि तायडे काकू गस्तीदारांसाठी चहा तयार करतात. रात्रीच्या काळोखात मिळणारा गरम चहाचा कप त्यांच्या श्रमांना ऊब आणि सेवेला बळ देतो.
“देशाच्या सीमेवर २० वर्षे सेवा केली. आता कॉलनीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही तास देणे हे माझे कर्तव्यच आहे,” असे सुर्वे सांगतात. कारगिल युद्धाच्या काळात जखमी होऊनही लढाई न सोडल्याची त्यांची जिद्द आज या गस्तीतूनही दिसते.
चोरीच्या भीतीवर केवळ चर्चा करून थांबायचे की आपल्या वस्तीच्या सुरक्षेसाठी पुढे यायचे? सुर्वे यांनी कृतीतून उत्तर दिले आहे. पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही आणि नागरिकांची सतर्कता यांना अशी साथ मिळाल्यास सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. सैनिक कॉलनीतील हा उपक्रम प्रत्येक वस्तीला जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे












Total Users : 3547643