डोणगाव (हॅलो बुलडाणा) डोणगाव ते आरेगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना खड्डेमय व धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डांबरीकरणाचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत.
रिसोडला जाणारा हा मुख्य मार्ग संत गजानन महाराज मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती व सहकार विद्यामंदिरामुळे सदैव वर्दळीचा असतो. मात्र, गतवर्षीपासून रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे व उघडी गिट्टी पसरलेली आहे, ज्यामुळे प्रवाशांना वाहन चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे.
वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संतप्त नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.