बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज जागतिक पुस्तक दिनी कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वादाला पेटवणारी घटना समोर आली असून शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. “शिवाजी कोण होता?” या ऐतिहासिक पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकी, शिवीगाळ आणि सामाजिक वातावरण तापवणाऱ्या आरोपांपर्यंत पोहोचला आहे.
कोल्हापूरमधील प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी फोन करून तब्बल नऊ मिनिटे संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणादरम्यान पुस्तकाच्या लेखकाबाबत गैरसमज झाल्याने सुरुवात झाली आणि त्यानंतर परिस्थिती चिघळल्याचा आरोप आहे. आंबी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुस्तक हे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुस्तकाचा उद्देश शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा नसून ऐतिहासिक संदर्भ मांडणे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, या स्पष्टीकरणानंतरही आमदार गायकवाड संतप्त झाले आणि त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझी जीभ कापून टाकतो”, “घरात घुसून मारतो” आणि आंबी यांच्या घरातील आई,बहीण, पत्नी, यांना अश्लील शब्दात शिवीगाळ अशा प्रकारच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आंबी यांनी केला आहे. यासोबतच “तू पण पानसरे यांच्याकडे जाशील” अशा शब्दांत धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे.
ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र दोन्ही बाजूंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्याचे समोर आले आहे.
आंबी यांनी स्पष्ट केले की, “अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही पानसरे यांच्या विचारधारेतून घडलेले कार्यकर्ते आहोत. सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत राहू.” त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आमदारांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत असून “ज्या समाजांच्या मतदानाच्या बळावर सत्तेत पोहोचता, त्याच समाजाबाबत असे शब्द वापरणे कितपत योग्य?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











