spot_img
spot_img

EXCLUSIVE पीक गेलं, भाव पडला… आता बांधावरचा हिशेब घेऊन रविकांत तुपकर सरकारला जाब विचारणार! उद्या मलकापुरातून ‘दुष्काळ संघर्ष यात्रे’चा शंखनाद! पहिल्याच दिवशी नऊ गावांत संवाद, देवधाब्यात जाहीर सभा… ४ डिसेंबरला बुलढाण्यात ‘एल्गार महामोर्चा’!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दुष्काळाने पीक हातचं गेलं, उरलेल्या शेतमालाला बाजारात भाव नाही आणि दारात कर्जवसुलीचा तगादा! या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर उद्या, शनिवार, १४ नोव्हेंबरपासून मैदानात उतरणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या ‘दुष्काळ संघर्ष यात्रे’ला सकाळी १० वाजता मलकापुरात शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन करून सुरुवात होणार आहे.

दिवसभर गावागावांत, संध्याकाळी देवधाब्यात सभा

बेलाड, हिंगणी, जांभूळधाबा, आळंद, खामखेड, भालेगाव, कुंड, रनथम आणि विवरा या नऊ गावांत पहिल्या दिवशी यात्रा पोहोचेल. सायंकाळी ७ वाजता देवधाब्यात जाहीर सभा होणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता माकनेर येथून दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल, तर सायंकाळी ७ वाजता निमगावात जाहीर सभा होईल.

हेक्टरी एक लाख द्या, सरसकट कर्जमाफी करा!

क्षेत्रमर्यादेशिवाय हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार, सोयाबीनला १२ हजार रुपये भाव द्यावा, कापसावर ३० टक्के आयात शुल्क लावावे आणि सोयापेंड आयात थांबवावी, अशीही मागणी आहे. खासगी फायनान्स कंपन्यांच्या कथित सक्तीच्या वसुलीविरोधात कठोर कायदा, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी विशेष आर्थिक पॅकेज, जनावरांसाठी चारा-पाणी आणि विद्यार्थ्यांची शुल्कमाफी यांचाही मागण्यांत समावेश आहे.

बांधावर नुकसानीची पाहणी, बुलढाण्यात महामोर्चा

किती पीक गेलं? हातात किती उत्पन्न आलं? सरकारी मदत किती मिळाली? या प्रश्नांची उत्तरं तुपकर थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत. गावांत मुक्काम करून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातील आणि शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांच्याही अडचणी ऐकतील. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून २१ दिवस फिरणाऱ्या या यात्रेची सांगता ४ डिसेंबरला बुलढाण्यात ‘एल्गार महामोर्चा’ने होणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर होणाऱ्या या महामोर्चात दुष्काळग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तुपकरांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!