दुसरबीड (हॅलो बुलढाणा/ बाळासाहेब भोसले) समृद्धी महामार्गावर दुसरबीडनजीक तळेगाव परिसरात मोठा साखळी अपघात झाला. आज, १३ नोव्हेंबर रोजी, सकाळी साडेअकरा ते दुपारी बाराच्या दरम्यान चॅनेज क्रमांक ३१८ येथे ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, स्टीलच्या चादरींचे रोल घेऊन जाणाऱ्या वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या सिमेंट मिक्सरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेपाठोपाठ मागून येणारी भरधाव वाहने एकामागोमाग एकमेकांवर आदळली. या साखळी अपघातात आठ ते दहा वाहने सामील असल्याचा प्राथमिक अंदाज असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातातील काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जालन्याला हलवण्यात आले आहे. सिमेंट मिक्सर महामार्गावर कशामुळे उभा होता, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. अपघातात नेमकी किती वाहने सामील होती आणि किती जण जखमी झाले, याचाही तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. अधिक माहिती मिळताच ‘हॅलो बुलढाणा’ पुढील अपडेट देईल.













Total Users : 3746555