दुसरबीड (हॅलो बुलढाणा/बाळासाहेब भोसले) समृद्धी महामार्गावर एकामागोमाग वाहने आदळली. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये प्रवासी अडकले होते. त्याच मार्गाने नागपूरहून जालन्याकडे निघालेले माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे घटनास्थळी थांबले. गाडीचे दरवाजे तोडून त्यांनी अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात मदत केली आणि जखमी रवाना होईपर्यंत ते तिथेच थांबले.
दुसरबीडनजीक तळेगाव परिसरात १३ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा ते दुपारी बाराच्या दरम्यान चॅनेज क्रमांक ३२१ वर हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, स्टीलच्या चादरींचे रोल घेऊन जाणाऱ्या वाहनाने महामार्गावर अपघातग्रस्त सिमेंट मिक्सरला धडक दिली. त्यानंतर एकामागोमाग वाहने आदळली. प्राथमिक माहितीत पंधरा ते सोळा वाहनांचा अंदाज आहे. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे वाहने थांबली असताना मागून आलेल्या सुमारे १५ ते १६ वाहने एकमेकांवर आदळली
काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले आहे.अपघातात नेमकी किती वाहने सामील होती आणि किती जण जखमी झाले, याबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.
समृद्धीवर आणखी किती अपघात झाल्यावर सरकार जागं होणार?
महामार्गावरील वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधत टोपे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. अधिकृत तपशील मिळताच ‘हॅलो बुलढाणा’ पुढील अपडेट देईल.
पोलिसांची माहिती
समृद्धी महामार्गावर चॅनेज क्रमांक ३२१ जवळ सिमेंट मिक्सर पलटी झाल्याने वाहतूक मंदावली होती. त्याच ठिकाणापासून काही अंतरावर मागून आलेल्या मोठ्या ट्रेलरने लहान वाहनांना पाठीमागून धडक दिली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात १५ ते १६ वाहनांचे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही.













Total Users : 3751332