spot_img
spot_img

EXCLUSIVE कामगारांचा पैसा, कामगारालाच का मिळेना? फुंडकरांच्या जिल्ह्यात दिवाळीचे ₹५ हजार अजून खात्यात नाहीत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्या हातांनी इतरांची घरं उभी केली, त्याच हातांना दिवाळीत पाच हजार रुपयांच्या मदतीची वाट पाहावी लागली. लेकरांना कपडे घेऊ, घरात फराळ आणू, अशी आशा बांधकाम कामगारांना होती. दिवाळी सरली, तरी अपेक्षित रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचा आरोप बुलढाणा मजदूर संघटनेने केला आहे. कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती असेल, तर कामगारांनी दाद कुणाकडे मागायची?

सात महिने झाले, अर्ज कुठे अडला?

दिवाळीची मदत रखडली, तशीच कामगारांच्या मुलांसाठीची शैक्षणिक मदतही अडकली आहे. शैक्षणिक सहाय्यासाठी दाखल केलेले अर्ज सात महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर जोगदंड यांनी सांगितले. शाळेची फी आणि वह्या-पुस्तकांचा खर्च थांबत नाही. मग कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा अर्ज निकाली काढायला सात महिने का लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘आता बैठका नकोत, आश्वासनं नकोत, फक्त निर्णय पाहिजे!’

प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, रखडलेल्या योजना सुरू करा आणि दिवाळीचे पाच हजार रुपये कामगारांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी जोगदंड यांनी केली. कामगारांना मदत नेमकी कधी मिळणार, याची तारीख प्रशासनाने जाहीर करावी, अशी अपेक्षा आहे. मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर बांधकाम कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशाराही जोगदंड यांनी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!