spot_img
spot_img

‘पाच की पंधरा?’ तिकिटावरून वाद… अन् आळंदला पोहोचलेली एसटी अचानक माघारी का फिरली? प्रवाशाने ‘नोकरी घालवतो’ अशी धमकी दिल्याचा महिला वाहकाचा आरोप. एसटी थेट देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात, प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) ‘माझं तिकीट पाच रुपयांचं, तुम्ही पंधरा का मागता?’ असोला जहाँगीर फाट्यावरून बसमध्ये चढलेल्या एका प्रवाशाने महिला वाहकाला असा सवाल केला. वाहकाने सवलतीसाठी दिव्यांगत्वाचे कार्ड मागितले. तेव्हा ‘वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तुमची नोकरी घालवतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वाद एवढा वाढला की आळंदला पोहोचलेली एसटी थेट देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आणावी लागली.

१२ नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास देऊळगाव राजातून ५७ प्रवाशांना घेऊन बस निघाली. चालक गोकुळ जोहरे आणि वाहक शारदा तुपकर कर्तव्यावर होते. साडेचारच्या सुमारास असोला जहाँगीर फाट्यावर आणखी चार प्रवासी चढले. बस आळंदकडे जात असताना तुपकर यांनी त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितले. त्यापैकी एका प्रवाशाने आपल्याकडे दिव्यांगत्वाचे कार्ड असल्याचे सांगितले. मात्र, कार्ड दाखवण्यास आणि तिकिटाचे पैसे देण्यास त्याने नकार दिल्याचे तुपकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता आणि बसमधून उतरण्यास सांगितल्यावर त्याने शिवीगाळ व दमदाटी केली, असाही तक्रारीत आरोप आहे. तुपकर यांनी चालकाला प्रकार सांगितल्यानंतर बस आळंदहून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. चौकशीत प्रवाशाने आपले नाव ज्ञानेश्वर रमेश खार्डे (रा. आळंद) असे सांगितले. तुपकर यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५(१) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२१, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!