सिंदखेडराजा मलकापूर पांग्रा, ता. (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) लोबानाचा दरवळ, अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या आणि दर्गाभर लुकलुकणाऱ्या पणत्या! मलकापूर पांग्रा येथील हजरत कासिमशाह बाबा दर्ग्यात ८ नोव्हेंबरला दिवाळीचा उत्सव अशा भक्तिमय वातावरणात रंगला. साबीर बाबा साहब यांच्या पुढाकारातून ३०० हून अधिक दीप आणि पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. शेकडो ज्योतींनी उजळलेला दर्गा यंदाच्या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरला.
लोबान आणि अगरबत्ती अर्पण करून उत्सवाला सुरुवात झाली. दिवाळीनिमित्त दर्गा परिसरात आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने परिसर सजला होता. त्यात पणत्यांच्या प्रकाशाची भर पडली. दीपप्रज्वलनानंतर चंद्रयानी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पणत्यांच्या लखलखाटात फटाक्यांची रोषणाई मिसळली आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
या दर्ग्यात दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. यंदाही साबीर बाबा साहब यांनी पुढाकार घेत ही परंपरा जपली. उत्सवासाठी त्यांनी विशेष तयारी केली होती. यावेळी त्यांचे शिष्यही उपस्थित होते. दर्ग्याच्या आवारात दिवाळीचा आनंद साजरा करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
मलकापूर पांग्र्यातील या दीपोत्सवाने सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. दर्ग्याच्या अंगणात दिवाळीच्या पणत्या लावण्याची परंपरा गावात आजही जिवंत आहे, हे यंदाच्या उत्सवाने पुन्हा दाखवून दिले.












Total Users : 3738874