देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) “आई, एकदा भरती झाली की तुला काही कमी पडू देणार नाही. वनरक्षकचा वर्दी घालून गावात येणार.” वरुडच्या पवन अंबादास इंगळेचं (वय २२) हे वाक्य आता त्याच्या घराच्या भिंतींवरच आदळतंय. कारण पवन आता नाही. त्याचं वनरक्षक होण्याचं स्वप्न आता फक्त एका फोटोत उरलंय.
पवन देऊळगाव राजा येथे शिक्षण घेत होता. सकाळी लवकर उठून धावणं, अभ्यास, ग्राउंडवर मेहनत… त्याचा दिवस फक्त एकाच ध्येयासाठी होता वनरक्षक व्हायचं!
मित्र म्हणतात, “पवनला जंगल खूप आवडायचं. वर्दी घालायची त्याला प्रचंड ओढ होती. तो नेहमी म्हणायचा “एक दिवस मी जंगलाचं रक्षण करणार.” पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.रस्त्यावरून जात असताना अचानक समोर आलेल्या मोकाट गायीची धडक बसली. एका क्षणात सगळं संपलं. धावणारे पाय थांबले, पाहणारे डोळे मिटले, आणि आईच्या हातातलं स्वप्न निखळून पडलं.२२ वर्षांचा तरुण… ज्याने अजून आयुष्य पाहिलंच नव्हतं, तो एका बेजबाबदार व्यवस्थेचा बळी ठरला.
▪️प्रश्न मोकाट गायीचा नाही, बेजबाबदार व्यवस्थेचा आहे!
देऊळगाव राजा शहरात मोकाट जनावरं ही आता नवी गोष्ट राहिली नाही. रस्त्यावर कधीही, कुठूनही जनावरं समोर येतात. आज पवन गेला, उद्या कोण?
यापूर्वीही अशाच अपघातात अनेकजण जखमी झाले. अनेक कुटुंबांनी आपली माणसं गमावली. तरीही नगरपालिका प्रशासन झोपलेलं का आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पवनच्या जाण्याने एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. आई-वडिलांनी ज्या पोरावर सगळ्या आशा लावल्या होत्या, तोच पोरगा आता फोटोत दिसणार आहे.
त्याचे मित्र आजही त्याच्या जागेवर जाऊन बसतात. त्याची धावण्याची जागा रिकामी आहे. त्याचं पुस्तक अर्धवट आहे. त्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. आता तरी मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा, रस्ते सुरक्षित व्हावेत, अशी कळकळीची मागणी नागरिक करत आहेत.












Total Users : 3732141