मेहकर (हॅलो बुलढाणा) यंदाच्या दिवाळीत मेहकरमधील महापुरुषांच्या स्मृतीस्थळांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळाला. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी रोषणाईचा संपूर्ण खर्च स्वतः उचलत शहरात अनोखा दीपोत्सव साजरा केला. महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, महात्मा जोतिराव फुले आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची स्मृतीस्थळे तसेच अशोक वाटिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले. नगराध्यक्ष गारोळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी चारही महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
दिवाळीच्या उत्सवात सार्वजनिक स्मृतीस्थळांना केंद्रस्थानी आणणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. रोषणाईमुळे स्मृतीस्थळांना नवे रूप मिळाले. त्याचबरोबर या महापुरुषांच्या कार्याची आणि विचारांची नव्या पिढीला आठवण करून देण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सर्व मेहकरकरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या दीपोत्सवाला गटनेते तथा नगरसेवक विलासराव चनखोरे, नगरसेवक प्रा. सतीश ताजणे, महेश रिंढे, नितीन तुपे, वैभव मानवतकर, वैभव उमाळकर, कैलासभाई सुखदाने, अमर घोडे, निसार अन्सारी, विलास शिंदे आणि गोपाल गायकवाड उपस्थित होते. त्यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या दीपोत्सवाने यंदाच्या मेहकरच्या दिवाळीत वेगळी छाप सोडली.












Total Users : 3737889