spot_img
spot_img

दिवाळीत अंजनी बुद्रुकमधून दुष्काळाला ललकार! मेहकरच्या गावोगावी ‘जलतारा’साठी उभारणार युवा फळी

मेहकर (हॅलो बुलढाणा) पावसाचं पाणी गावातच जिरवायचं आणि दुष्काळाशी लढण्यासाठी गावोगावी तरुणांना एकत्र आणायचं! दिवाळीच्या पर्वावर मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे झालेल्या ‘जलतारा’ मार्गदर्शन परिषदेत शेतकरी नेते तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी हा निर्धार व्यक्त केला. मेहकर तालुका जलसमृद्ध करण्यासाठी गावोगावी युवा फळी उभारून जनजागृती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. निसर्गाचा बिघडता समतोल वेळीच सावरला नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दीचे औचित्य साधून पाटील यांच्या पुढाकारातून ही परिषद आयोजित करण्यात आली.

 

दुष्काळातही विहिरींना पाणी कसं टिकलं?

‘जलतारा’ संकल्पनेचे जनक आणि जलतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी मराठवाड्यातील आपल्या गावाचा अनुभव मांडला. भूजलपातळी खोल गेलेल्या गावात ‘जलतारा’च्या माध्यमातून पावसाचं पाणी जमिनीत जिरवलं. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीतही गावातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी टिकून असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी केलेल्या कामांची उदाहरणं देत त्यांनी प्रकल्पाचा प्रवास उलगडला. विदर्भातील शेतकऱ्यांसमोरील संकटाचा उल्लेख करत अधिकाधिक गावांनी ‘जलतारा’ प्रकल्प राबवावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

मार्गदर्शनासाठी ५० किलोमीटरवरून आले शेतकरी!

लोणी गवळी, आंध्रुड, शेंदला, उमरा, देऊळगाव माळी, पिंप्री माळी आणि भोसा यांसह परिसरातील अनेक गावांतून शेतकरी परिषदेला आले होते. अंजनी बुद्रुकपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील मालेगावातूनही शेतकरी मार्गदर्शन ऐकण्यासाठी पोहोचले.

माजी गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, राष्ट्रवादीचे भास्करराव काळे, शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. योगेश टोणपे यांनी सूत्रसंचालन केलं. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, स्थानिक उत्सव मंडळे, स्मारक समिती, युवा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांनी परिषदेच्या आयोजनात सहभाग घेतला. भागवत दिगडे, सुनील नागोलकर, पांडुरंग लांड यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!