spot_img
spot_img

धाड बसस्थानकात ९४ हजारांचे दागिने गायब… पोलिसांनी तासाभरात लावला छडा, चार महिलांना अटक!

धाड (हॅलो बुलढाणा) बसस्थानकात एका महिलेच्या बॅगेतून दागिने चोरीला गेल्याची तक्रार येताच पोलिसांनी तपास सुरू केला. धाडमधील विशाल विसपुते आणि प्रदीप टाकसाळ यांनी दिलेल्या माहितीवरून पथकाने घटनेनंतर अवघ्या एका तासात चार संशयित महिलांचा शोध घेतला. अंगझडतीत सुमारे सात ग्रॅम वजनाची सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास रेखा संजय विसपुते यांच्या बॅगेतून सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत आणि एक ग्रॅम गोल्डची पोत चोरीला गेली. दोन्ही पोतींची एकूण किंमत ९४ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी धाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक ४३५/२०२६ दाखल करण्यात आला.

श्रुती रोहित कटटी (३०), अर्चिता सिनु कटटी (२०), इंदु रामु कटटी (२५) आणि अक्षता राजु कटटी (२०) अशी संशयित महिलांची नावे आहेत. चौघीही जालना जिल्ह्यातील जाफ्राबादच्या रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे, उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान, हेड कॉन्स्टेबल सुनील सोनुने आणि महिला कॉन्स्टेबल छाया गोमलाडू यांच्यासह धाडच्या पथकाने ही कारवाई केली. संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन धाड पोलिसांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!