spot_img
spot_img

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याच्या दारात वसुली अधिकारी ! तुपकरांनी अधिकाऱ्याला जागेवरच धुतलं! वरिष्ठ अधिकाऱ्याचेही फोनवरून उपटले कान!

मोताळा (हॅलो बुलढाणा) अरे, माणुसकी आहे की संपली? ऐन दिवाळीच्या दिवशी… घराघरात लक्ष्मीचं पूजन चाललंय, पोरं नवीन कपडे घालून फिरतायत, त्या दिवशी तुम्ही वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरात जाऊन ठिय्या मांडून बसता? लाजा वाटू द्या जरा, असे ठणकावत रविकांत तुपकर यांनी वसुली अधिकाऱ्याला हाकलून लावले तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून चांगलेच धुतले.

 

पान्हेरा गावात ग्रामीण कुटुंबाच्या वसुली अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्याच्या घरात घुसून तगादा लावला. “पैसे दिल्याशिवाय इथून उठणार नाही” अशी मुजोरी केली.योगायोगाने त्याच परिसरात असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांना ही माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी धडकले. दरम्यान वसुली अधिकाऱ्याला
तुपकरांनी कडक सवाल केले.

‘दिवाळीच्या दिवशी लोकांच्या घरी माणसं पाठवता? लाजा वाटू द्या जरा! तुमच्यात मानवता शिल्लक आहे की नाही?’
“शेतकरी मरतोय, दुष्काळात पिकं गेली, हातात पैसा नाही… आणि तुम्ही दिवाळीला दारात बसता? हा माज कुठून आला?’ असे खडेबोल सुनावत वसुली अधिकाऱ्याला गावातून हाकलून लावले.
दरम्यानफक्त तिथल्या कर्मचाऱ्याला नाही, तर थेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे फोन लावून तुपकरांनी कान उपटले व संबंधित शेतकरी कुटुंबाला धीर दिला.

▪️तुपकरांचा सरकारला थेट इशारा..

दुष्काळ आहे, शेतकरी अडचणीत आहे. या वर्षाचं खासगी फायनान्स आणि मायक्रोफायनान्सचं संपूर्ण व्याज माफ करा, शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब करू नका! RBI सोबत बोलून तातडीने कायदेशीर निर्णय घ्या
दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात आनंदाऐवजी वसुलीचा तगादा लावणाऱ्यांनी वेळीच सावध व्हा! नाहीतर आंदोलनाचा वणवा पेटेल, आणि तो विझवणं कुणालाच जमणार नाही,असा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!