spot_img
spot_img

गावात दिवाळीचे दिवे, शेतात आगीचे लोळ… २२ क्विंटल कापसासह वर्षभराची मेहनत राख!मोताळ्याच्या गुगळीतील घटना | ४२ क्विंटल शेतमाल, चार एकरांचा ठिबक संच आणि जनावरांचा चाराही खाक

मोताळा (हॅलो बुलढाणा) ऐन दिवाळीच्या दिवशी मोताळा तालुक्यातील गुगळी येथील शेतकरी गुणवंतराव देशमुख यांच्या शेतातील गोदामाला भीषण आग लागली. वर्षभर कष्ट करून पिकवलेला आणि गोदामात साठवलेला शेतमाल डोळ्यादेखत जळून गेला. या आगीत देशमुख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोदामातून अचानक धुराचे लोट उठू लागले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गावकरी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र, ज्वाळांची तीव्रता एवढी होती की गोदामातील शेतमाल आणि साहित्य वाचवता आले नाही.

आगीत अंदाजे २२ क्विंटल कापूस, १४ क्विंटल गहू आणि ६ क्विंटल मका जळून खाक झाला. चार एकरांसाठीचा संपूर्ण ठिबक सिंचन संच आणि इतर शेती साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जनावरांसाठी साठवलेला चाराही जळाल्याने त्यांच्या दावणीचा प्रश्न उभा राहिला आहे.

शेतमालातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घरखर्च आणि पुढच्या हंगामाचे नियोजन अवलंबून होते. आता शेती पुन्हा कशी उभी करायची आणि तोवर गुरांना काय खाऊ घालायचे, असे प्रश्न देशमुख कुटुंबासमोर आहेत. प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. ऐन सणात एवढा मोठा फटका बसलेल्या या कुटुंबापर्यंत मदत नेमकी कधी पोहोचणार, हा आता सवाल आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!