किनगाव राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) चारित्र्याच्या संशयाने एका सुखी संसाराचा अक्षरशः घात केला! अवघ्या २३ वर्षांच्या विवाहितेचा तिच्याच राहत्या घरात दोरीने गळा आवळून खून झाल्याची संतापजनक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे उघडकीस आली आहे. संजीवनी विजय दाभाडे असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी पती विजय संजय दाभाडे (३१) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी समजूत… अन् आज संसाराचा शेवट!
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, विजय दाभाडे याला दारूचे व्यसन होते. पत्नी संजीवनी कोणाशी तरी फोनवर बोलते, या संशयातून तो तिला वारंवार मारहाण करीत होता. २० ऑक्टोबर रोजी मारहाण झाल्यानंतर संजीवनीचे वडील सुधाकर वाघमारे कुटुंबीयांसह किनगाव राजा येथे पोहोचले. यावेळी विजयने पुन्हा दारू पिणार नाही आणि पत्नीशी भांडणार नाही, असे आश्वासन दिले होते.मात्र, अवघ्या दोन दिवसांतच होत्याचे नव्हते झाले!
दरवाजा उघडला अन् वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली!
२२ ऑक्टोबर रोजी सकाळी घरमालकाचा फोन आल्यानंतर संजीवनीचे आई-वडील आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा आतून बंद होता. विजयने दरवाजा उघडल्यानंतर संजीवनी पलंगावर चादर पांघरलेल्या अवस्थेत आढळली. अंगावरील चादर काढताच तिच्या गळ्यावर दोरीचे वळ दिसले. फिर्यादीनुसार, विचारणा केली असता विजयने गळा आवळून मारल्याचे सांगितले.
दोन निष्पाप चिमुकल्यांच्या आयुष्यात अंधार!
२०२१ मध्ये विवाह झालेल्या संजीवनीला आदित्य आणि अंतरा अशी दोन लहान मुले आहेत. आईच्या मृत्यूमुळे या दोन्ही चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.
पोलिसांची वेगवान कारवाई; आरोपी गजाआड!
किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३७४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.अवघ्या दोन दिवसांपूर्वी दिलेले आश्वासन अन् आज पत्नीचा मृत्यू! चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या कथित हत्येने संपूर्ण किनगाव राजा हादरले असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.





Total Users : 3647252