मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) नवदुर्गा विसर्जनाचा उत्साह ओसरत असतानाच मलकापूर शहरात घडलेल्या एका भयंकर घटनेने खळबळ उडाली आहे! घरी परतणाऱ्या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने अचानक ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २१ ऑक्टोबरच्या रात्री सुनील टॉकीज परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
क्षणात घडला थरार; हल्लेखोराने साधली संधी!
राकेश मोहनदास तलरेजा हे इस्टेट ब्रोकर बांधकाम व्यावसायिक असून सुनील टॉकीज परिसरातील रहिवासी आहेत. नवदुर्गा विसर्जनानंतर मोबाईलवर बोलत ते घराकडे परतत होते. याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने शेजारच्या रस्त्याने बोळीत प्रवेश केला आणि काही क्षणांतच तलरेजा यांच्या अंगावर ॲसिड फेकून पळ काढला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात ॲसिड डोळ्यांत गेल्याने एका डोळ्याला गंभीर इजा झाली, तर दुसऱ्या डोळ्यालाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ॲसिडचा श्वसनमार्गावरही परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना जालना येथे हलविण्यात आले.
हल्लेखोर कोण? पूर्ववैमनस्य की आणखी काही?
हा हल्ला अचानक झाला की पूर्वनियोजित होता? हल्लेखोराने चेहरा का झाकला होता? राकेश तलरेजा यांनाच लक्ष्य करण्यामागे नेमके कारण काय? अशा अनेक प्रश्नांनी मलकापूर शहरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या गंभीर गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याची मागणी होत आहे.
मलकापुरात दहशतीचे सावट निर्माण करणाऱ्या या ॲसिड हल्ल्यामागचा खरा चेहरा कधी समोर येणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे!







Total Users : 3644946