बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून अनेक उमेदवार रिंगणात असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात मात्र ही निवडणूक पूर्णपणे प्रादेशिक अस्मितेवर केंद्रित झाली आहे. “आपल्या जिल्ह्यातील आणि आपलाच उमेदवार” ही भावना गुरुजी मतदारांमध्ये तीव्रतेने बळावल्याचे दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रा. दत्तात्रय लहाने बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे, या लढतीला एक वेगळाच रंग आला आहे. बुलढाणा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच् आजोळ, स्वराज्याची स्थापना करणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेबांच्या पवित्र जन्मभूमीची माती असलेला जिल्हा आहे. येथील मातीवर असलेले अफाट प्रेम आणि प्रादेशिक अभिमान यामुळे मतदारांमध्ये कमालीची जवळीक निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, प्रा. लहाने सरांच्या या पारड्यात जिल्ह्यातील पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे व महत्वाचे भरमसाठ मतदान पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सामान्य परिवारातील प्रा. दत्तात्रय लहाने यांची असामान्य झेप!
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अधिकृतपणे मैदानात उतरलेले प्रा. दत्तात्रय (डी. एस.) लहाने यांची मोर्चेबांधणी अत्यंत मजबूत मानली जात आहे. पक्षाने त्यांची उमेदवारी बऱ्याच आधी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग, विधवा व परित्यक्ता महिलांच्या पुनर्विवाहासाठी चालवलेली चळवळ आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्याचा दांडगा अनुभव यामुळे त्यांचा जनसंपर्क व्यापक आहे. ठाकरे गटाची भरभक्कम संघटनात्मक ताकद आणि शिक्षकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची त्यांची शैली यामुळे त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
विजय बुलढाण्याचाच!
या संपूर्ण निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, राजकीय पक्ष आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या तरी प्रबळ उमेदवार जिल्ह्याचा आहे. यामुळे निकालादिवशी विजयाची गुलाल कोण उधळणार हे नंतर ठरेल, परंतु या आमदारकी बुलढाणा जिल्ह्याचीच होणार” हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. प्रा. लहाने यांच्या रूपाने, जिजाऊंच्या मातीतील शिलेदारामुळे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष बुलढाणा जिल्ह्याकडे लागले आहे.







Total Users : 3646812