शेगाव (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांचा काळाबाजार मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पुकारलेले ‘मिशन परिवर्तन’ आता चांगलेच आक्रमक झाले आहे! तांबेंच्या ठोस नियोजनातून स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव-खामगाव मार्गावर धडक कारवाई करत तब्बल २० किलो ५६० ग्रॅम गांजासह १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन संशयितांना पकडण्यात आले आहे
१८ ऑक्टोबर रोजी सवर्णा शिवारातील यश ढाब्याजवळ गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. हुसेन खान युसूफ खान (२५) आणि आसिफ खान एजान खान (२९), दोघेही रा. शेगाव, यांच्याकडून १० लाख २६ हजारांचा गांजा, दोन दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, SP निलेश तांबे यांची गुन्हेगारीविरोधातील आक्रमक कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे! केवळ कागदी आदेश नव्हे, तर स्वतंत्र पथके, गोपनीय माहिती आणि थेट कारवाई या त्रिसूत्रीवर तांबेंनी भर दिला आहे. अमली पदार्थांविरोधातील त्यांच्या या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या धडाकेबाज कारवाईमागे संपूर्ण पोलीस पथकाची मेहनत!
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा), अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळ, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, चालक सहायक फौजदार विकास देशमुख, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.तांबेंचे ‘मिशन परिवर्तन’ आता केवळ घोषणा राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष कारवाईतून दिसू लागले आहे! मात्र २० किलो गांजा नेमका आला कुठून आणि कुणाकडे जाणार होता? या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होणार का? आता शेगाव ग्रामीण पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे






Total Users : 3630748