सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळतोय, तर दुसरीकडे मलकापूर पांग्र्यात पिण्याचे पाणी थेट नाल्यांत वाहून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे! पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करण्याची वेळ येत असताना ही उधळपट्टी थांबवणार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मलकापूर पांग्रा येथे प्रत्येक प्रभागाला आठवड्यातून एकदाच अवघ्या ४५ मिनिटांचा पाणीपुरवठा होतो. मात्र, अनेक ठिकाणी नळ उघडे राहत असल्याने मौल्यवान पाणी गल्ल्यांतून थेट नाल्यांत वाहत आहे. दुष्काळाचे संकट डोक्यावर असताना पाण्याची अशी नासाडी चिंताजनक ठरत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गावात काही ठिकाणी थेट नळजोडण्या असल्याचे सांगितले जात असून, काहींना दररोज पाणी मिळत असल्याचा नागरिकांचा दावा आहे.मग सर्वांना समान पाणीपुरवठा होतोय का? अनधिकृत जोडण्यांची तपासणी कधी होणार?
ग्रामपंचायत प्रशासकांनी तातडीने नळजोडण्यांची तपासणी, गळती दुरुस्ती आणि पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.






Total Users : 3628131