बुलढाणा (हॅलो बुलढाणा) परंपरेचा अभिमान, श्रद्धेची अखंड ज्योत आणि भक्तीचा उत्साह! बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथील दुर्गा माता मंदिराचा नवरात्र महोत्सव यंदा ५३व्या वर्षात दाखल झाला आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उत्सवाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले असून, देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक सहभागी होत आहेत.
यंदाच्या उत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे ते खाटू श्याम बाबा मंदिराचा देखावा! मंदिर समितीने साकारलेल्या या आकर्षक देखाव्यामुळे नवरात्र सोहळ्याला वेगळे रूप मिळाले आहे. देवीची आराधना आणि खाटू श्याम बाबांच्या मंदिराची प्रतिकृती, अशा दुहेरी आकर्षणामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे.
दररोज सायंकाळी ७.३० वाजता महाआरती आयोजित करण्यात येत आहे. आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. देवीची पूजा-अर्चा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांतून कारंजा चौकात भक्तीचा जागर सुरू आहे. महाआरतीच्या वेळी भाविक एकत्र येऊन दुर्गामातेच्या चरणी श्रद्धा अर्पण करतात.
पाच दशकांहून अधिक काळ जपलेली ही उत्सवपरंपरा कारंजा चौकाची खास ओळख बनली आहे. मंदिर समितीच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून सुरू असलेला हा सोहळा स्थानिक नागरिकांना एकत्र आणतो. श्रद्धेसोबत एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा उत्सव म्हणूनही त्याचे महत्त्व कायम आहे.
५३व्या वर्षातील महोत्सवासाठी मंदिर परिसर सज्ज असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव भव्य स्वरूपात साजरा होत आहे. आकर्षक देखावा, नियमित महाआरती आणि महाप्रसाद या उपक्रमांतून भाविकांना उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळत आहे. या परंपरेत प्रत्येक भाविकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेशही समितीने दिला आहे.
उत्सवातील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष कमलेश कोठारी, भगवान जोशी, सुनिता जोशी, शिवाजी पाटील, अशोक व्यास, रवींद्र भगत, निखिल शर्मा, सोमु कायस्थ, सुनिल बोधेकर, निनाजी भगत, रितेश अग्रवाल, जगदीश जोशी, सुधीर जोशी, सुधीर भालेराव, रतन बोर्डे, तुषार कोठारी, गजानन पडोळ, संतोष म्हस्के, दीपल जोशी, रवी ताजने, संतोष ठाकूर, विनोद बराटे, राज पुरोहित, राणाजी, प्रवीण कोचर आणि मंदिर समितीने केले आहे.






Total Users : 3603334