spot_img
spot_img

‘शोले स्टाईल’ टाकीवर चढले भुतेकर; आता अधिकाऱ्यांना खाली उतरून उत्तर द्यावेच लागणार! इसरूळमध्ये निकृष्ट कामाचा आरोप; १५ दिवसांची मुदत संपताच टाकीवरून एल्गार!

इसरूळ (हॅलो बुलढाणा) ता चिखली, १३ ऑक्टोबर जनतेच्या पैशातून उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना प्रशासनाने काय केले? असा थेट सवाल करत युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी आज इसरूळ येथे ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले. जलजीवन मिशनच्या टाकीवर सहकाऱ्यांसह बसून त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्याची मागणी केली आहे.

टाकीच्या बांधकामात गंभीर त्रुटी असल्याचा भुतेकरांचा आरोप आहे. काम सुरू असतानाच वारंवार सूचना दिल्या; त्रुटींचा व्हिडिओही प्रसारित केला. निवेदनाद्वारे चौकशी आणि कारवाईसाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

जनतेचा पैसा खर्च होतोय, मग गुणवत्तेशी तडजोड का? असा सवाल उपस्थित करत स्वतंत्र तांत्रिक तपासणीची मागणी करण्यात आली आहे. दोष आढळल्यास अधिकारी, अभियंते आणि ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई व वसुली करावी, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे.

तपासणी पूर्ण होईपर्यंत उर्वरित देयकांबाबत नियमानुसार निर्णय घ्यावा. दुरुस्ती करायची की बांधकामाचा संबंधित भाग नव्याने उभारायचा, हे तांत्रिक अहवालातून स्पष्ट करावे, अशीही मागणी आहे.टाकीवर आंदोलन सुरू आहे; अधिकारी कधी येणार आणि चौकशीचा ठोस निर्णय कधी होणार?याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. समाधानकारक कार्यवाही होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा भुतेकरांनी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!