चिखली (हॅलो बुलढाणा) अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चिखली तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काही शिक्षकांना शालेय वेळेतच प्रचाराला जुंपले जात असल्याची चर्चा असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार महाराष्ट्रातील 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. अधिसूचना 29 सप्टेंबर, अर्जाची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर, छाननी 7 ऑक्टोबर, माघार 9 ऑक्टोबर, मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात येत असल्याने चिखली तालुक्यात प्रचाराची लगबग वाढली आहे.
▪️नियम काय सांगतो?
शिक्षकांना पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शालेय वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी ते प्रचारातही सहभागी होऊ शकतात. मात्र, शालेय वेळेत प्रचाराला सक्त मनाई आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 आणि RTE कायदा 2009 कलम 27 नुसार शासकीय वेळेत राजकीय प्रचार करता येत नाही.
▪️जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश काय आहे?
जिल्हाधिकारी यांनी BNSS कलम 163 अन्वये आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि शासकीय विश्रामगृह परिसरात प्रचार, सभा, मिरवणूक यास मनाई आहे. हा आदेश 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असून उल्लंघन केल्यास BNS कलम 223 नुसार कारवाई होईल.
▪️पालकांची नेमकी तक्रार काय?
नियम स्पष्ट असतानाही पदवीधर उमेदवार असलेल्या एका शिक्षकाकडून इतर शिक्षकांना शाळा वेळेतच प्रचारात उतरवल्याची चर्चा जोरात आहे. सकाळी 10 ते 5 या शालेय वेळेत शिक्षकांनी शाळेत हजर राहणे अपेक्षित असताना काही ठिकाणी शाळा वेळेआधीच सोडून प्रचार केला जात असल्याचा आरोप पालक करत आहेत. याकडे गटशिक्षणाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.






Total Users : 3602416