चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून तापाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. थंडी वाजणे, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि अशक्तपणा अशा तक्रारी घेऊन महिला, पुरुषांसह लहान मुलेही मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, काही रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश्य लक्षणे आढळत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, नाल्यांची अपुरी स्वच्छता आणि घरांच्या परिसरातील टायर, कुंड्या, डबे तसेच इतर वस्तूंमध्ये पाणी साचून राहणे यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हिवताप आणि डेंग्यूसारख्या डासजन्य आजारांचा धोका अधिक गंभीर बनत आहे.
नागरिकांनी तापाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. सतत ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, उलट्या, डोळ्यांच्या मागे वेदना अथवा त्वचेवर पुरळ अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक रक्तचाचण्या करून घ्याव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. वारंवार उलट्या किंवा रक्तस्रावासारखी गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालय गाठावे.
दरम्यान, पालिकेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांनी शहरातील सर्व प्रभागांत नियमित फवारणी सुरू असल्याचे सांगितले. बीएससी पावडरची फवारणी, नाल्यांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि कचऱ्याची विल्हेवाट यावर आरोग्य विभागाने भर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले











Total Users : 3527547