बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धाड येथील भरसभेत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यानंतर बुलढाण्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. “मी केबिनमध्ये बसून फोनवर धमक्या देणारा नाही. माझं डोकं फिरलं तर पाचव्या मजल्यावरून येऊन कार्यक्रम करून टाकीन. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका,” असा इशारा देत गायकवाडांनी नाव न घेता आमदार श्वेता महाले आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्यावर निशाणा साधला होता. “अभी तो बच्चा उतरा है, बाप की एन्ट्री बाकी है सेठ!” या त्यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.
आता आमदार श्वेता महाले यांनीही गायकवाडांच्या वक्तव्याला तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “कोण कुणाचा कार्यक्रम करतो, हे जनता ठरवते. तुम्ही ८० हजार मतांनी निवडून येण्याच्या गप्पा मारत होतात; मात्र अवघ्या पाचशे, सहाशे, सातशे किंवा आठशे मतांनी निवडून आलात. त्यामुळे कुणाचा कार्यक्रम कोण करतो, हे सांगण्याची गरज नाही,” असा टोला महाले यांनी लगावला.
“बूम समोर आला की काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला असे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. ज्यांना शक्तिप्रदर्शन करायचे आहे, त्यांनी ते खुशाल करावे. मी बुलढाण्यात जनतेची सेवा आणि माझ्या पक्षाच्या विस्तारासाठी आले आहे,” असेही त्यांनी ठणकावले.
दरम्यान, प्रशांत आंबी प्रकरणावर बोलताना महाले म्हणाल्या, “कोणत्याही महिलेविषयी शिवीगाळ करणे किंवा चुकीची भाषा वापरणे मुळातच योग्य नाही.” गायकवाडांच्या ‘पाचव्या मजल्या’च्या इशाऱ्याला महालेंनी दिलेल्या ‘८०० मतांच्या’ प्रत्युत्तरामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर आल्याचे चित्र आहे












Total Users : 3443298