spot_img
spot_img

गणरायाच्या उत्सवात ‘अफवांचा विघ्नासुर’ नको! शांतता राखा, पर्यावरण जपा; उत्कृष्ट मंडळांना पोलिसांचा खास पुरस्कार – एसपी निलेश तांबे

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावणाऱ्या अफवा, सोशल मीडियावरील अपप्रचार आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना थारा देऊ नका! जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याची सामाजिक सलोखा आणि शांततेची परंपरा कायम ठेवत गणरायाचा उत्सव भक्तिभावाने, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करा, असे स्पष्ट आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.

 

गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, १० सप्टेंबर रोजी जळगाव जामोद नगरपरिषदेच्या योगा हॉलमध्ये पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे होते. अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम मच्छरे, तहसीलदार पवन पाटील, मुख्याधिकारी सूरज जाधव, पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सोनाळ्याचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, नगराध्यक्ष गणेश दांडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी मिरवणूक मार्ग, ध्वनिक्षेपकांचा वापर, वाहतूक नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत स्पष्ट सूचना दिल्या. “अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडू नका आणि कोणतीही संशयास्पद बाब तातडीने पोलिसांना कळवा,” असा कडक संदेश बैठकीतून देण्यात आला.

यंदा पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक प्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना ‘गणराया पोलीस मित्र मंडळ पुरस्कार’ देऊन स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात येणार आहे. यावेळी २५ शांतिदूत आणि २५ जलदूतांची नियुक्ती करण्यात आली. गणेश मंडळांनीही शांतता व बंधुभाव कायम ठेवण्यासाठी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!