चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली नगर परिषदेच्या कथित श्वान निर्बीजीकरण कारभाराचा आणखी एक संतापजनक चेहरा समोर आला आहे! २४९५ कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा, केवळ ४९३ GPS फोटो आणि सुमारे ३० लाख ६४ हजार रुपयांच्या देयकाबाबत ‘हॅलो बुलढाणा’ने कालच प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यानंतर आता शहरातील मुकुल वासनिक भवनातील बंद हॉलमध्ये अनेक कुत्र्यांना कोंडून ठेवल्याचे, तर त्यांच्याच बाजूला एका कुत्र्याचा मृतदेह कुजत पडल्याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
पाच वर्षीय आयांश प्रमोद सुरडकर याच्यावर मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र नियोजनबद्ध कारवाई करण्याऐवजी पकडलेले कुत्रे मुकुल वासनिक भवनातील बंद हॉलमध्ये डांबण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल वरवंडे यांनी केला आहे. आपल्या पाळीव कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना हॉलमध्ये हे विदारक दृश्य दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये हॉलच्या जमिनीवर विष्ठा, उष्ट्या अन्नाच्या थाळ्या आणि प्रचंड अस्वच्छता दिसत आहे. एका कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेतील श्वानाचा मृतदेह असून त्यावर किडे पडल्याचा दावाही करण्यात आला आहे. जिवंत कुत्र्यांच्या बाजूलाच मृतदेह कुजत असताना पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे या भवनाच्या भिंतीलगतच चिखलीचे उपजिल्हा शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्गंधी, माशा, जिवाणू आणि इतर संसर्गाचा धोका निर्माण होऊन रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य संकटात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्राणिजन्म नियंत्रण नियम, २०२३ नुसार कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केल्यानंतर मूळ परिसरात सोडणे अपेक्षित आहे. सार्वजनिक सभागृहाला कोणत्या आदेशाने कथित श्वान कोंडवाड्यात बदलण्यात आले? तेथे पशुवैद्यक, उपचार, अन्न-पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था आहे का? मृत कुत्र्याचा पंचनामा झाला का? त्याच्या विल्हेवाटीची नोंद कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे आता मुख्याधिकाऱ्यांना द्यावीच लागणार आहेत.
यापूर्वी सचिन राठी यांनी ४६.६६ लाख रुपयांच्या योजनेबाबत गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. आता आयांशवरील हल्ला आणि मुकुल वासनिक भवनातील या कथित अमानवी प्रकारामुळे पालिकेचा श्वानबंदोबस्त संशयाच्या अधिकच खोल गर्तेत गेला आहे. दोषींवर तातडीने कारवाई, कुत्र्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था, मृतदेहाची शास्त्रीय विल्हेवाट आणि संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याची मागणी होत आहे












Total Users : 3443292