चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहील) बहिणीला माहेरी घेऊन येत असताना दुचाकी घसरल्याने खाली पडलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना आज सकाळी चिखली तालुक्यातील शेलसूर फाट्याजवळ घडली. रेश्मा बी तौफिक तंबोली (वय २८, रा. जळगाव खानदेश) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेश्मा बी यांना त्यांचा भाऊ जळगाव येथून दुचाकीवर माहेरी घेऊन येत होता. सकाळी सुमारे ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास त्यांची दुचाकी शेलसूर फाट्याजवळ अचानक घसरली. त्यामुळे रेश्मा बी रस्त्यावर कोसळल्या. नेमक्या त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसचे पुढील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
क्षणार्धात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहेरी भेटीसाठी निघालेल्या बहिणीचा डोळ्यांसमोर मृत्यू झाल्याने भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.












Total Users : 3439829