जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपत असताना पीककर्जासाठी बँकेच्या दारात हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जळगाव जामोद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेकडून पीककर्जासाठी अडवणूक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप खेर्डा बु., वडशिंगी, उटी, निंभोरा बु., बोराळा बु. व खुर्द परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, २०१९ मध्ये घेतलेल्या पीककर्जाचे २०२३ मध्ये पुनर्गठन करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी घरी येऊन इंग्रजी कागदपत्रांवर सह्या घेतल्या. कर्जाची रक्कम वाढवून मिळेल, असे सांगण्यात आले; मात्र आता नवीन पीककर्ज मागितल्यानंतर “डेअरी कर्ज प्रलंबित आहे, ते फेडल्याशिवाय पीककर्ज मिळणार नाही,” असे सांगितले जात आहे. संमतीविना वाढीव रक्कम डेअरी कर्जात समाविष्ट केल्याचा खळबळजनक आरोपही शेतकऱ्यांनी केला.
इतर बँका १०० रुपयांच्या स्टॅॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेत असताना येथे ५०० रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती का? नोटरी केल्यानंतरही सामूहिक सातबारा धारकांना प्रत्यक्ष सह्यांसाठी पुन्हा का बोलावले जाते? असे सवाल उपस्थित करण्यात आले. महसूलमंत्र्यांबाबतही शाखा व्यवस्थापकाने कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात आहे.
कथित अनियमिततेची चौकशी करून शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रवीण भोपळे, राम वानखडे, कैलास भगत, ज्ञानेश्वर दुगाणे, रमेश वानखडे, समाधान गिरे, अमोल उमाळे, श्रीकृष्ण तायडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Total Users : 3432442