चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली नगर परिषदेच्या कागदावर तब्बल २४९५ मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण झाले. संबंधित कंत्राटदाराला करकपातीपूर्वी जवळपास ३० लाख ६४ हजार रुपये अदा करण्यात आले. मात्र शहराच्या रस्त्यांवरील कुत्र्यांची दहशत काही संपलेली नाही. संभाजीनगरमध्ये मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय आयांश प्रमोद सुरडकर याच्यावर अचानक हल्ला करून त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. त्यामुळे चिखली नगर परिषद आणि कुत्रे पकडणाऱ्या कंत्राटदाराचा कारभार पुन्हा एकदा गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आयांश घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी अचानक आलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. आयांशला पळण्याची संधीही मिळाली नाही. तो खाली पडताच कुत्र्याने त्याला दोन ठिकाणी गंभीर चावे घेतले. सोबतच्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर विमलबाई येवतकर, तुळसाबाई अवसरमोल, गोपाल येवतकर, समाधान अवसरमोल, कुसाबाई हिवाळे आणि आयांशची आजी विमल सुरडकर यांनी धाव घेऊन कुत्र्याला पिटाळले. त्यामुळे चिमुकल्याचा जीव बालंबाल वाचला.
आयांशला तातडीने चिखलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले; मात्र जखमा खोल आणि गंभीर असल्याने तसेच आवश्यक इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्याला बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
संभाजीनगरमधील ही तिसरी गंभीर घटना असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी १० ते १२ कुत्र्यांच्या झुंडीने एका बकरीवर हल्ला केला होता. एका वृद्धालाही कुत्र्यांनी चावा घेतला होता. तरीही पालिकेची यंत्रणा आणि कंत्राटदार नेमके कुठे आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, २४९५ कुत्र्यांवर प्रक्रिया केल्याचा दावा असताना केवळ ४९३ GPS फोटो उपलब्ध आहेत. उर्वरित २००२ कुत्र्यांचे पुरावे कुठे आहेत? कुत्रा नोंदवही, शस्त्रक्रिया व लसीकरण नोंदी, पशुवैद्यकीय अभिलेख, औषधसाठा, लसींचे बॅच तपशील आणि जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीची माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप तक्रारदार सचिन सुभाष राठी यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवर ८० दिवस उलटूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचाही आरोप आहे.
सिओ साहेब, प्रत्यक्ष कामाचे पुरावे नसताना ३० लाखांचे बिल कोणाच्या ‘ओके’ने पास झाले? कंत्राटदाराने कुत्रे पकडले की फक्त बिलांचा आकडा वाढवला? पालिकेला एखाद्या चिमुकल्याचा जीव गेल्यानंतरच जाग येणार आहे का? आता चौकशीचे कागदी घोडे नाचवण्याऐवजी कंत्राटाची विशेष आर्थिक व तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी चिखलीकरांकडून होत आहे.












Total Users : 3430153