सातारा (वृत्तसेवा/हॅलो बुलढाणा) बुलढाण्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या पुत्रावर साताऱ्यातील नामांकित वकील ॲड. शाहिद शहाबुद्दीन इनामदार यांनी मारहाण, धमकी आणि लूटमारीचे गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इनामदार यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, कारवाई होत नसल्याचा दावा करत थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचे पुत्र आहान पाटील यांनी ॲड. इनामदार यांना कार्यालयात बोलावले होते. जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून तसेच कामेश कांबळे यांच्याबाबत प्रश्न विचारत धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर प्रशांत साळुंखे, सुजस येवले, नितीन शिंदे, रोहित शिंदे, संतोष येवले यांच्यासह सात ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतकेच नव्हे, तर जबरदस्तीने पाया पडून माफी मागायला लावली, हातातील सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची अंगठी काढून घेतली आणि “तू ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा माणूस आहेस,” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक दावाही करण्यात आला आहे.
घटनेनंतर चार दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे. त्यामुळे बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांच्या पुत्रावर झालेल्या या आरोपांप्रकरणी पोलिस दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, हे सर्व आरोप तक्रारीवर आधारित असून त्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधितांची बाजूही अद्याप समोर आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबातून सत्य बाहेर येणार असून, आता साताऱ्यासह बुलढाणा जिल्ह्याचेही लक्ष पोलिसांच्या भूमिकेकडे लागले आहे.













Total Users : 3430768