देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शहरात मागील काही दिवसांपासून डेंगूसदृश तापाने अक्षरशः थैमान घातले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत नागरिक ताप, अंगदुखी, सांधेदुखी आणि प्रचंड अशक्तपणाने त्रस्त झाले आहेत. शहरातील खासगी तसेच सरकारी दवाखाने तापाच्या रुग्णांनी भरत असून, दररोज सुमारे २० ते २५ नवीन रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक रुग्णांच्या रक्त तपासणीत प्लेटलेट्स कमी झाल्याचे समोर येत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊळगाव मही येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झालेल्या अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी थेट जालना गाठावे लागत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना खासगी उपचार आणि प्रवासाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन नेमके कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे? शहरातील नाल्यांची अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
ग्रामपंचायतीने संपूर्ण शहरात युद्धपातळीवर औषध फवारणी व धूर फवारणी करावी, नाल्यांची साफसफाई करून डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत आणि आरोग्य विभागाने विशेष तपासणी शिबिर सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी घरातील साठवलेले पाणी दर आठ दिवसांनी बदलावे, टाक्या व हौद झाकून ठेवावेत, अंगभर कपडे घालावेत आणि ताप आल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.













Total Users : 3431936