मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाची धग अखेर दिल्लीच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मलकापूर शहरात शनिवारी जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा देणाऱ्या विविध पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील चौकात फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष केला.
हा एका मंत्र्याचा राजीनामा नसून अन्यायाविरोधात लढणाऱ्या देशातील विद्यार्थी आणि युवाशक्तीचा नैतिक विजय आहे. अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि न्यायाच्या प्रश्नांकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या जल्लोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, ॲड. स्नेहल तायडे, प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, बळीराम बावस्कर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय झनके, वसीम सर, मोहम्मद इकबाल, संजय इंगळे, सतीश दांडगे, डॉ. अशोक सुरडकर, प्रा. शुभम सावळे, करण झनके, धनराज गोळे, जितू गोळे, सय्यद ताहेर, इमरान लकी, चांद चव्हाण, आमिर खान, वाजिद खान, रामेश्वर गोरले आणि चि. तक्षक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.











