मेहकर (हॅलो बुलडाणा/ गजानन राऊत) धावत्या लक्झरी बसमध्ये चालक आणि वाहकाने मोबाइलवर रील बनविण्याच्या नादात केलेल्या कथित निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अवघ्या दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 25 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबईहून पुसदकडे समृद्धी महामार्गाने निघालेली एमएच 29 बीई 3233 क्रमांकाची लक्झरी बस रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ आली. याच दरम्यान चालक आणि वाहक मोबाइलवर रील तयार करण्यात मग्न असल्याचा आरोप आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच लक्झरी बस रस्त्यावर पलटी झाली.
या भीषण अपघातात पियुष यशपाल राठोड (वय दीड वर्ष) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड, किंकाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने मेहकर व परिसरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, बस उलटताना समोरून येणाऱ्या कारलाही धडक बसली. एमएच 40 डीई 1348 क्रमांकाच्या कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांचे कुटुंब जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालकांच्या बेफिकीर वर्तनामुळे निष्पाप जीवांचा बळी जात असल्याने प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.










