डोणगाव (हॅलो बुलडाणा) पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका उघड झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात संतापाची लाट उसळली असून तात्काळ बडतर्फीची जोरदार मागणी होत आहे. पत्रकार संदीप नारायणराव पळसकर यांनी पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करत ठाणेदारांच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे.
निवेदनानुसार, नागरे यांच्या निष्काळजी व बेफिकीर वर्तनामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून अनेक तक्रारी धूळ खात पडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये आरोपींना थेट पाठीशी घालण्याचा संशय व्यक्त होत असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीबाबतही टोलवाटोलवी करून अपूर्ण व उशिरा माहिती देण्यात आल्याने प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुमारे १.८० लाखांच्या फसवणूक प्रकरणातही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदार संतप्त आहेत. गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सामान्य माणसाला न्याय मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून ठाणेदार नागरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींना त्वरित अटक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २० एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील गृह मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
या प्रकरणामुळे डोणगावसह संपूर्ण तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










Total Users : 3289762