बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी सर्पमित्राचाच सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खामगाव तालुक्यातील जनुना येथे घडली आहे. साप पकडून जंगलात सोडताना झालेल्या दंशामुळे मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्पमित्रांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश कांबळे हे जनुना गावातील धाडसी आणि तत्पर सर्पमित्र म्हणून ओळखले जात होते. गावात कुठेही साप दिसल्याची माहिती मिळाली की, ते जीवाची पर्वा न करता तात्काळ घटनास्थळी धाव घ्यायचे. अनेक वेळा त्यांनी विषारी साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले होते आणि त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले होते.
घटनेच्या दिवशीही गावात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगेश यांनी साप पकडला. त्यानंतर सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी ते जनुना तलाव परिसरात गेले. मात्र साप सोडत असतानाच अचानक सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर मंगेश यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवाने अकोल्याकडे नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मंगेश कांबळे यांच्या मृत्यूमुळे जनुना गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. “मंगेशमुळे अनेकांचे जीव वाचले, पण आज त्यांचाच बळी गेला,” अशा शब्दांत गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर सर्पमित्रांनी साप पकडताना आणि जंगलात सोडताना अधिक सुरक्षितता पाळण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून मृतकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.










Total Users : 3290236