किनगावराजा (हॅलो बुलडाणा) तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या युवकाचा मृतदेह प्रकरण आता गूढतेतून उकलू लागले असून, ही घटना अपघात नव्हे तर थेट खून असल्याचे समोर आले आहे! सुरेश तुकाराम आर्दड (रा. राजा टाकळी, ता. घनसावंगी, जि. जालना) या युवकाचे अज्ञात मारेकऱ्यांनी अपहरण करून निघृणपणे खून केल्याचे उघड झाले आहे.
२८ जून रोजीच घनसावंगी पोलिस ठाण्यात सुरेशच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजताच्या सुमारास तढेगाव शिवारात एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवली गेली होती. मात्र, आज झालेल्या अधिक तपासात मृताची ओळख पटली आणि खळबळजनक सत्य बाहेर आले. मारेकऱ्यांनी सुरेशचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीतील तढेगाव शिवारात टाकून दिला. या हत्याकांडाने दोन्ही जिल्ह्यांत खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर गुन्हेगारांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
किनगावराजा पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद नरवाडे, पोहेकॉ. विष्णू मुंढे व पोशि. सुभाष गीते तपासात गुंतले असून, आरोपींचा छडा लावण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. आता मारेकरी गजाआड जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!