spot_img
spot_img

राजकीय विश्लेषण! ‘चला निवडणुकीवर बोलू काही.. उताविळांना आमदार व्हायची घाई! -वाढत्या जनसंपर्कामुळे ‘तारे जमी पर’ ची जनतेला अनुभूती! -बुलढाणा व मेहकर मतदार संघात शिवसेनाच्या दोन्ही गटात चूरस!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) प्रमुख पक्षांचे उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केव्हाचेच तयारीला लागलेत.खास करून बुलढाणा व मेहकर विधानसभा मतदारसंघात ‘आमदारकीचा’ मोह राजकारण्यांच्या ठायी-ठायी दिसत असून इच्छुक उताविळांना सुद्धा आमदार व्हायची घाई झाल्याचे दिसते.त्यामुळे जनसंपर्क कमालीचा वाढला असून ‘तारे जमीन पर’ ची अनुभूती जनता घेत आहे.

बुलढाणा व मेहकर मतदार संघात शिवसेने च्या दोन्ही गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याने दोन्ही गटात चुरस निर्माण झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अनेक विकास कामे खेचून आणली आणि मतदार संघातील जनसंपर्काची त्यांची पहिली फेरी केव्हाचीच आटोपली आहे. तरीही त्यांच्या पायाला भिंगरी बांधलेलीच दिसतेय.दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जालिंदर बुधवत उमेदवारीवर दावा ठोकत हाती मशाल घेऊन गावोगावी यात्रा करताहेत.त्यांच्या साथीला काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सुद्धा ताकदीने भिडले. राजकारणात कोण कुणाचा कसा गेम करेल याचा नेम नसल्याने आणि प्रत्येकाला राजकारणातील हिशेब चुकते करायचे असल्याने इतर उमेदवारांसह भाजपाचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे देखील तुफान बनवून मैदानात उतरलेत.शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभेत अडीच लाख मत मिळविल्याने ते मोठ्या विश्वासाने विधानसभा लढविणार आहेत.त्यांनी नुकतेच अन्नत्याग आंदोलन करून मंत्रालय हलवून टाकले.ते कोणत्या मतदारसंघातून लढतात हे येणारी वेळ सांगणार असून त्यांची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. वाटत नसले तरी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांची सुद्धा पद्धतशीरपणे खेळी सुरु असून त्या आंदोलन, निवेदन भेटीगाठीतून मतदार संघ पिंजून काढताहेत.भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी राजकारणातून समाजकारण करण्याचे ठरविल्याने ते देखील आमदारकीसाठी प्रयत्नरत असून आंदोलनात्मक पवित्र्यातून समस्यांना वाचा फोडताना दिसताहेत. अल्पावधीतच त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.मोताळा बुलढाणा विधानसभा लढविण्यासाठी शिवसेना नेते प्रेमलता सोनोने जनसंवाद यात्रेतून जनतेशी थेट संवाद साधत आहेत.बुलढाणा मतदार संघ महिलांसाठी राखीव ठेवावा अशी मागणी देखील त्यांनी रेटून धरली. इतरही इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी दमछाक करीत आहेत.
▪️मेहकर मतदार संघात शिवसेनाच्या दोन्ही गटात चूरस! 

लोणार-मेहकर विधानसभा या राखीव मतदार संघात प्रमुख उमेदवारासह इच्छुकांची भाऊ गर्दी आहे.विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ संजय रायमुलकर व उबाठा शिवसेना गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे यांच्यात चूरस दिसून येत आहे.केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची या मतदारसंघावर पकड असली तरी लोणार व मेहकर परिसरात अनेक समस्या कायम असल्याने आमदार रायमुलकर यांना विधानसभा निवडणूक कठीण जाणार आहे.तर शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यावरही शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम निष्ठावंत प्रकाश डोंगरे यांनी केल्यामुळे त्यांचा या भागात बराच बोलबाला दिसून येतोय.प्रकाश डोंगरे यांनी तत्पूर्वीच गावोगावी कॉर्नर बैठका घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून शिवसेना पक्ष मजबूत करण्याचे कार्य सुरू ठेवलेले आहे.मैत्रीपूर्ण स्वभाव असल्याने त्यांच्याशी जनतेची नाळ जुळलेली असून आणि स्थानिक असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.शिवाय इतर पक्षाचे उमेदवार व अन्य इच्छुक देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.यंदाच्या आमदारकीसाठीकुणी नोकरी सोडली तर पुणे मुंबई वरून गावात येऊन गणपतीच्या आरत्या करीत आहेत तर जनतेला विकासाची स्वप्न दाखवून समस्या सोडविण्याचे आश्वासन देतांना दिसताहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!