spot_img
spot_img

BIG BREAKING! चिखलीत चौकाचौकांत ‘आता तरी लाज वाटू द्या!’चे बॅनर! कुत्र्यांच्या दहशतीने चिखलीकर हतबल; सीओ बिडकरांचा खुर्चीचा मोह काही सुटेना? सचिन राठींचा प्रशासनावर आरोपांचा बॉम्ब; १४१ दिवस फाईल दाबली कुणी? आता बॅनर हटवणार की निष्पापांचे जीव वाचवणार?

चिखली (हॅलो बुलढाणा) चिखलीत मोकाट कुत्र्यांची दहशत, नागरिकांवर वाढते हल्ले आणि नगरपालिकेच्या कारभाराविरोधातील संताप आता थेट चौकाचौकांत पोहोचला आहे! ‘आता तरी लाज वाटू द्या!’ अशा जळजळीत शब्दांचे बॅनर शहरात झळकल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार सचिन सुभाष राठी यांनी या बॅनरमधून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडणाऱ्या ‘हॅलो बुलढाणा’ने सातत्याने प्रशासनाला जाब विचारला. मात्र कुत्र्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच गेली! या वृत्तमालिकेदरम्यान किमान पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या. मेहकर रोडवरील यश चोपडा असो किंवा निष्पाप चिमुकली झुबिया… आणखी किती जणांचे रक्त सांडल्यानंतर प्रशासन जागे होणार?

‘अतिकर्तव्यदक्ष’ सीओ बिडकर साहेब, नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा खुर्ची महत्त्वाची झाली काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.राठी यांनी बॅनरमधून नसबंदीच्या कामातील कथित अनियमितता, प्रलंबित फाईल आणि निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, नगरपालिकेची परवानगी न घेताच बॅनर लावल्याचे राठी यांनी जाहीर केले असून, आता त्यावर प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते, हे पाहण्याचे आव्हान दिले आहे!

‘हॅलो बुलढाणा’ला कोणाला प्रसिद्ध करायचे नाही, तर सत्य जनतेसमोर आणायचे आहे! लाखो वाचकांसाठी सुरू झालेली ही लेखणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेपर्यंत थांबणार नाही! बॅनर हटवण्यासाठी प्रशासन धावणार, की आधी चिखलीकरांना कुत्र्यांच्या दहशतीतून वाचवणार?

राठींच्या बॅनरमधील सहा सवालांनी खळबळ!

१. आणखी किती निष्पापांवर हल्ले होण्याची वाट पाहणार? नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?

२. तब्बल १४१ दिवस उलटूनही फाईल का दाबली? साधी कार्यवाही न केल्याचा राठींचा आरोप!

३. कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामात संशयास्पद कागदपत्रे स्वीकारली कुणी? निधीच्या वापराबाबत गंभीर सवाल!

४. चिमुकल्यांचे जीव धोक्यात असताना नसबंदीच्या नावाखाली पैशांचा खेळ सुरू आहे काय?

५. शोभेच्या मूर्ती, कमानी, फवारे आणि मंडपांसाठी कोट्यवधींचा खर्च; मग नागरिकांच्या सुरक्षेसाठी १०-२० लाख रुपये खर्च करण्यास टाळाटाळ का? असा लोकप्रतिनिधींना सवाल!

६. निष्पाप नागरिकांवर हल्ले होत असताना पाहूनही गप्प बसणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना लाज कधी वाटणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!