बुलढाणा (हॅलो बुलढाणा) घाटबोरीच्या जंगलातील सागवान वृक्षतोडीचा घोटाळा आता वनविभागातील बड्यांची झोप उडवू लागला आहे! ‘हॅलो बुलढाणा’ने कालच या प्रकरणातील कथित ‘पुष्पा’, संशयास्पद वाहनांची भूमिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सवालांचा भडिमार केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे!
राहुलनंतर भारत तिवाले गजाआड; पाच दिवसांची वनकोठडी!
मेहकर तालुक्यातील भोसा, वनकक्ष क्रमांक १८१ मधील अवैध सागवान वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाने भारत महादेव तिवाले (रा. दुगबोरी, ता. मेहकर) याला १७ ऑक्टोबर रोजी अटक केली. मेहकर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. यापूर्वी राहुल मेहेत्रेला अटक झाली असून जेसीबी, ४०७ टेम्पो, ट्रॅक्टर आणि कटर मशीन जप्त करण्यात आली आहेत.
येवलेंची खुर्ची वाचणार की निलंबनाचा बडगा बसणार?
या घोटाळ्यात वनपाल-वनरक्षकांवर कारवाई झाल्यानंतर RFO अंकुश येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीला पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रस्तावाचे पुढे काय झाले? येवलेंचा पदभार काढला जाणार का? वरिष्ठांच्या जबाबदारीची चौकशी किती खोलवर जाणार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप बाकी आहेत!
‘पुष्पा’ कोण? आता भारतच्या चौकशीतून काय बाहेर पडणार?
राहुलच्या कथित जबाबात ‘पुष्पा’चे नाव आल्याची सूत्रांची माहिती असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा नाही. आता दुसऱ्या आरोपीच्या चौकशीतून सागवान कुठे गेले, वाहने कुणाच्या सांगण्यावरून वापरली आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोण आहे, याचा उलगडा होणार का?मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक जमीर शेख आणि दक्षता अधिकारी कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांनी अटकेची कारवाई केली.






Total Users : 3628125