बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भरवस्तीचा सर्कुलर रोड… प्रवाशांनी खचाखच भरलेली बस… अन् अचानक धावत्या बसने घेतला पेट! बुलढाणा शहरात आज घडलेल्या या थरारक घटनेने एकच खळबळ उडाली! बुलढाणा-लोणार एसटी बसला अचानक आग लागल्याने ६० ते ७० प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मात्र दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. त्यानुसार सर्कुलर रोडवरून जात असताना बसने अचानक पेट घेतला. भरवस्तीतील या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.
अन् याच क्षणी मदतीला धावले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे शहरप्रमुख मनोज चंदन आणि सचिन देशलहरा! दोघांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. स्थानिक नागरिकांनीही क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाहतूक पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धडक दिली. भरवस्तीच्या रस्त्यावर प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसला अचानक आग लागलीच कशी? एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आग लागण्याचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे!






Total Users : 3623551