spot_img
spot_img

चक्क आधुनिक ड्रोन मधून अवतरला गणराय! पारंपरिक भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम! अनुराधा अभियंत्रिकीत गणेशाचा महात्सोव!

चिखली (हॅलो बुलढाणा) ढोल-ताशांचा गजर सुरू होता, विद्यार्थ्यांच्या भक्तीमय जयघोषाने वातावरण भारावून गेले होते आणि उपस्थितांच्या नजरा एकटक आकाशाकडे लागल्या होत्या. काही क्षणांतच आकाशात घोंघावणाऱ्या ड्रोनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तंत्रज्ञानाच्या पंखांवर विराजमान झालेले श्री गणराय हळूहळू आकाशातून महाविद्यालयाच्या प्रांगणात अवतरले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनच्या सहाय्याने अनुराधा अभियंत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात बाप्पाचे झालेले आगमन उपस्थितांचे डोळे दिपवणारे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया!’च्या जयघोषाने संपूर्ण अनुराधा परिसर दुमदुमून गेला होता.

‘Vighnaharta of the Digital Age’ या हटके संकल्पनेवर आधारित करण्यात आलेली बाप्पाची प्रतिष्ठापना विशेष आकर्षण ठरली. आकाशातून भूमीकडे येणाऱ्या बाप्पाच्या या आगळ्यावेगळ्या आगमनाने काही क्षणांसाठी महाविद्यालयाचे प्रांगण जणू तंत्रज्ञानाच्या रंगमंचात रूपांतरित झाले होते. एका बाजूला शतकानुशतके जपलेली गणेशभक्ती, तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील तंत्रज्ञानाची झेप या दोन्हींचे मनोहारी दर्शन या क्षणातून घडले. परंपरेच्या धाग्यात विणलेला आणि आधुनिकतेच्या रंगात नटलेला अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा ‘गणेशोत्सव २०२६’चा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये Digital Vighnaharta’ या संकल्पनेतून हायटेक गणपती मूर्तीचे AI व ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले. रायफल शूटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकाग्रता व नेमबाजीचे कौशल्य दाखविले. नृत्य, गायन व ट्रेझर हंटद्वारे विद्यार्थ्यांच्या कलात्मक, बौद्धिक व साहसी गुणांना वाव मिळाला. तसेच लकी ड्रॉ व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला.
यावेळी परमहंस रामकृष्ण मौनिबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे आणि संस्थेच्या सचिव अॅड. सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती केली. यावेळी प्राचार्य डॉ.अरूण नन्हई, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भक्तिभावाने गणरायाचे स्वागत केले. अनुराधा परिवाराच्या वतीने आयोजित गणेशोत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक तसेच तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने परंपरेसोबत आधुनिकतेची सांगड घालत गणरायाच्या आगमनातूनही एक अभिनव संदेश दिला.

▪️राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले…
गणेशोत्सवाला तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची जोड!

अनुराधा परिवाराच्या गणेशोत्सवाला यंदा केवळ धार्मिक सोहळ्याचे स्वरूप न देता सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर कसा करता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक ड्रोनद्वारे गणरायाचे आगमन या उपक्रमातून पाहायला मिळाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या महाविद्यालयाने गणरायाच्या आगमनातूनही परंपरा आणि प्रगती यांच्यातील सुसंवादाचा संदेश दिला. श्रद्धेची मुळे सांभाळत तंत्रज्ञानाच्या नव्या क्षितिजांकडे झेप घेण्याची विद्यार्थ्यांची ऊर्जा या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवली, असल्याचे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. यावेळी राहुलभाऊ बोंद्रे यांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा दीप असाच अखंड तेवत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!