spot_img
spot_img

BREAKING! ‘किंग इज बॅक’; बुलढाणा जिल्हा बँकेच्या सिंहासनावर डॉ. राजेंद्र शिंगणे!गोविंद मिरगे उपाध्यक्ष; घाटावर अन् घाटाखालील नेतृत्वाचा सन्मान!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल १८ वर्षांची प्रशासकीय राजवट संपली आणि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या राजकारणात पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे पर्वाचा दमदार प्रारंभ झाला! माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची आज, बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदाची माळ घाटाखालील नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे गोविंद मिरगे यांच्या गळ्यात पडली.

बँकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदासाठी गोविंद मिरगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे दोन्ही नेत्यांची निवड अविरोध घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी शिंगणे आणि उपाध्यक्षपदी मिरगे यांच्या निवडीमुळे घाटावरील आणि घाटाखालील नेतृत्वाला समान सन्मान मिळाल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने २१ पैकी तब्बल १९ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडविला होता. त्यामुळे अध्यक्षपदावर डॉ. शिंगणे यांची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चितच मानले जात होते. आजच्या अविरोध निवडीने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले!

सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संचालक मंडळावरील मजबूत पकड आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर डॉ. शिंगणे यांनी जिल्हा बँकेची धुरा पुन्हा हाती घेतली आहे. निवड जाहीर होताच समर्थकांमध्ये जल्लोष उसळला असून, सोशल मीडियावर ‘किंग इज बॅक’चे पोस्टर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे, ‘हॅलो बुलढाणा’ने दोन दिवसांपूर्वीच डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देत या राजकीय घडामोडीचे स्पष्ट संकेत दिले होते. अखेर ‘हॅलो बुलढाणा’चे वृत्त पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!