देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) महसूल पथक दिसताच टिप्परमधील रेती रिकामी करून वाहने धरणाच्या बुडीत क्षेत्रात उभी केली; मात्र कारवाईचा फास चुकला नाही! जाफराबाद आणि देऊळगाव राजा महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवत तब्बल १ कोटी २० लाख रुपये किमतीचे सहा टिप्पर जप्त केले.या कारवाईने अवैध रेती वाहतुकीला मोठा दणका बसला आहे.
२४ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास जाफराबाद महसूल पथकाला गस्तीदरम्यान अवैध रेती उत्खननाशी संबंधित नऊ टिप्पर आढळले. पथक दिसताच चालकांनी तीन टिप्पर जाफराबाद हद्दीतील शिवारात नेले. उर्वरित सहा टिप्परमधील रेती रिकामी करून वाहने सिनगाव जहागीर–खल्याळ गव्हाण मार्गावरील धरणाच्या बुडीत क्षेत्रात उभी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हद्द बदलली; कारवाई थांबली नाही!
जाफराबादचे तहसीलदार मंगेश साबळे यांनी देऊळगाव राजा तहसीलदारांशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तपासणीत सहाही टिप्परमध्ये नुकतीच रेती वाहून नेल्याच्या खुणा आढळल्या. वाहने रिकामी असली, तरी अवैध रेती वाहतुकीसाठी वापरल्याच्या संशयावरून ती ताब्यात घेण्यात आली.
जप्त वाहनांमध्ये एमएच २८ बीबी ७५८६ क्रमांकाचा पिवळा भारतबेंझ टिप्पर आणि पाच पांढरे विनानंबर टिप्पर आहेत. पाच वाहनांवर नंबरच नसल्याचा तपशील या कारवाईत समोर आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनमालकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७४/२०२६ दाखल करण्यात आला. सहाही टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शरद साळवे पुढील तपास करीत आहेत.
या मोहिमेत नायब तहसीलदार सायली जाधव, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, शिपाई ताठे, प्रवीण डोईफोडे, विजय दराडे आणि दोन्ही तालुक्यांतील पथकांनी सहभाग घेतला. पहाटेच्या अंधारात सुरू असलेल्या संशयित रेती वाहतुकीवर दोन तालुक्यांच्या यंत्रणांनी समन्वयाने कारवाई केली.
नऊ टिप्पर आढळले, सहा जप्त झाले; उर्वरित तीन वाहनांबाबत काय कार्यवाही होणार? रेती कुठून भरली, कुठे नेली जाणार होती आणि वाहतुकीमागे कोणाचा सहभाग होता? या प्रश्नांची उत्तरे शोधून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.





Total Users : 3659066