सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) गरिबांच्या हक्काचे धान्य मिळवण्यासाठीही वाद सहन करायचा का? सिंदखेड राजा तालुक्यातील वाघोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तक्रार अर्जातून आवाज उठवला आहे. नियमित धान्यवाटप होत नसल्याचा आणि लाभार्थ्यांना हक्कापेक्षा कमी धान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
२३ ऑक्टोबरच्या तहसीलदारांना उद्देशून लिहिलेल्या सामूहिक तक्रारीत दुकानदाराच्या मनमानीचा पाढा वाचण्यात आला आहे. धान्य मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी वाद घालून भांडण केले जाते, असेही अर्जात म्हटले आहे. शासनाची सार्वजनिक वितरण व्यवस्था गरजूंच्या मदतीसाठी असताना लाभार्थ्यांनाच धान्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे.
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून धान्य वितरणाच्या नोंदी, ई-पॉस मशीनवरील व्यवहार आणि प्रत्यक्ष धान्यसाठा तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. कमी धान्य देणे आणि अनियमित वाटपाचे प्रकार तपासून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची नियमानुसार कार्यवाही करावी, तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या योग्य दुकानदारामार्फत नियमित आणि पूर्ण धान्य मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही अर्जात आहे.
तक्रारीवरील कार्यवाहीची माहिती लेखी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता तहसील प्रशासन नोंदी तपासून ग्रामस्थांच्या आरोपांचा छडा लावणार कधी? हक्काच्या धान्यासाठी उठलेला हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणार का? संबंधित दुकानदाराची बाजू उपलब्ध झालेली नाही.





Total Users : 3657763