बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खाऊ आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. अत्याचारानंतर बालिकेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शेख मोहम्मद पीर मोहम्मद या ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बालिका खाऊ आणण्यासाठी गेली होती. आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला दुकानात बोलावून अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एका व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पालकांनी बालिकेला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील करत आहेत.
खाऊसाठी बाहेर पडणाऱ्या चिमुकल्याही सुरक्षित नसतील, तर पालकांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी सखोल तपास आणि पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. बालिकेची सुरक्षितता, मानसिक आधार आणि गोपनीयता जपण्यालाही तितकेच प्राधान्य मिळाले पाहिजे. या गंभीर प्रकरणात तपासातून नेमके काय समोर येते आणि पुढील कारवाई कशी होते, याकडे आता लक्ष असेल.





Total Users : 3659065