spot_img
spot_img

कचरा आमच्या माथी, निर्णय तुमच्या हाती? आता चालणार नाही! सुंदरखेड-माळविहीरमध्ये ‘कचरारूपी रावणा’चे दहन; ‘डेपो हटवा, जिजाऊंचे स्मारक उभारा!’चा एल्गार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कचरा डेपोच्या निर्णयाविरोधात सुंदरखेड-माळविहीर परिसरातील नागरिकांचा संताप उफाळला आहे. माळविहीरच्या ई-क्लास जमिनीवरील नियोजित कचरा डेपोला कडाडून विरोध करत ग्रामस्थांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘कचरारूपी रावणा’चे प्रतीकात्मक दहन केले. “कचरा डेपो नको, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारकच हवे!” अशी ठाम मागणी करत नागरिकांनी प्रशासनाला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

सुंदरखेड, सावळा, माळविहीर, भादोला आणि पोखरी परिसरातील हजारो नागरिक या विरोधासाठी एकवटले. नियोजित प्रकल्पामुळे दुर्गंधी पसरेल, पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि नागरिकांच्या आरोग्यापुढे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. जनतेच्या आरोग्याशी संबंधित या चिंतांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सायंकाळी सहा वाजता सुंदरखेडच्या हनुमान मंदिराजवळ ‘सावळा-सुंदरखेड-माळविहीर परिसर कचरा डेपो विरोधी संघर्ष समिती’ आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. कचरारूपी रावणाचे दहन करून ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या निषेधातून प्रशासनाच्या निर्णयाला थेट विरोध नोंदवण्यात आला.

हा केवळ कचरा डेपोचा प्रश्न नसून परिसराचा सन्मान, आरोग्य आणि भावी पिढीच्या भविष्याचा लढा असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली. संबंधित जागेवर जिजाऊंचे स्मारक उभारण्याच्या मागणीवर नागरिक ठाम आहेत. प्रकल्पाचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नागरिकांच्या विरोधानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार? स्थानिकांच्या आरोग्यविषयक चिंतांना काय उत्तर देणार? कचरा डेपोचा निर्णय मागे घेणार की विरोध कायम असतानाही प्रकल्प पुढे नेणार? या प्रश्नांकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे. डेपोविरोध आणि स्मारकाची मागणी या दोन्ही मुद्द्यांवर ग्रामस्थ एकवटल्याने प्रशासनासमोर जनभावनेची दखल घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ‘कचरा डेपो नको, जिजाऊ स्मारकच हवे,’ हीच आंदोलनाची ठाम भूमिका आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!