spot_img
spot_img

HELLO BULDANA IMPACT! ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीचा दणका; आकाशदादांनी कृषिमंत्र्यांसमोर उघडलं ‘बियाणे कांड’… अन् दुसऱ्याच दिवशी मोठा धमाका! 5 नमुने अप्रमाणित; ‘त्या’ कंपनीविरुद्ध खामगाव पोलिसांत गुन्हा दाखल

खामगाव (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या ‘हॅलो बुलढाणा’च्या आक्रमक वृत्तांकनाचा पुन्हा एकदा मोठा परिणाम समोर आला आहे. सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्याचा गंभीर मुद्दा ‘हॅलो बुलढाणा’ने सातत्याने आणि ठामपणे लावून धरला. त्यानंतर खामगावचे आमदार तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी थेट कृषिमंत्र्यांसमोर हा मुद्दा मांडला आणि आता अवघ्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे.

यशोदा हायब्रीड सिड्स प्रा. लि., हिंगणघाट, जि. वर्धा या कंपनीविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0357 नुसार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक अशोक बळीराम चव्हाण यांनी शासनाच्या वतीने या प्रकरणी फिर्याद दिली. आकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांच्या तक्रारीनंतर संबंधित सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीत पाच नमुने अप्रमाणित आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली.

इतकेच नव्हे, तर संबंधित बियाण्यांच्या पिशवीवर “No.1 Brand, Most Trusted Brand” असा दावा करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सत्यता दर्शक बियाण्यांचे उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंगची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे अधिनियम, बियाणे नियम 1968 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4) यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीच्या वेदनेला सर्वप्रथम प्रभावीपणे आवाज देत ‘हॅलो बुलढाणा’ने हा मुद्दा केवळ बातमीपुरता मर्यादित ठेवला नाही, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यानंतर आमदार तथा मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली होती.

आता प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याने या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, निकृष्ट आणि अप्रमाणित बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांना हा मोठा इशारा मानला जात आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बनून प्रश्न प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘हॅलो बुलढाणा’च्या निर्भीड आणि परिणामकारक पत्रकारितेचा हा आणखी एक ठोस परिणाम असल्याची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!